
‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा ७, ८ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत
रत्नागिरी : महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे ही संस्था महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाट्यगुणांना सकस व्यासपीठ मिळावे, या हेतूंनी गेली ५९ वर्षे, ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या स्पर्धेचे हे वैभवशाली ६० वे वर्ष आहे. सन २०१० पासून ही स्पर्धा, कोल्हापूर, जळगांव, रत्नागिरी आणि नागपूर या केंद्रांवर संपन्न होत आहे. या वर्षी ही स्पर्धा मंगळवार, दि. ७ ऑक्टोबर आणि बुधवार दि. ८ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे घेण्यात येणार आहे.
या एकांकिका स्पर्धेमध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड जिल्ह्यामधील वरिष्ठ महाविद्यालयीन संघाना सहभागी होता येईल. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड येथील अधिकाधिक महाविद्यालयांनी सहभागी व्हावे. या स्पर्धेचे लॉटस् शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथे टाकण्यात येणार आहेत.
एकांकिका स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांनी प्रवेश अर्ज स्पर्धेचे नियम व अटी यासाठी तसेच अधिक माहितीसाठी सौ. गौरी महाजन (७०५७७३८०३३) आणि संदीप जोशी (९६७३६३३४१८) यांच्याजवळ संपर्क साधावा, आणि या एकांकिका स्पर्धेला भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रत्नागिरी केंद्र संयोजक संदीप जोशी यांनी केले आहे.




