
चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावात परगावातील लोकांना जमिन खरेदीसाठी नो एन्ट्री
एकीकडे परप्रांतीयांनी कोकणातील जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावलेला असतानाच चिपळूण तालुक्यातील मोरवणे सारख्या गावाने एक आदर्शवत असा निर्णय घेतला आहे. गावातील जमिनी परगावातील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तींना विकू नयेत. एखाद्या कुटुंबाला आर्थिक गरजेपोटी जमीन विकायची झाल्यास ती गावातील लोकांना विकावी, असा एकमुखी ठराव मोरवणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत नुकताच करण्यात आला. या ठरावामुळे परप्रांतीय लोकांना जमीन विकण्यास आळा बसण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षात तालुक्यातील मोरवणे येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी विक्रीचे प्रकार सुरू आहेत. अनेक परप्रांतीय लोकांनी मोरवणे येथे जागांची खरेदी करून ठेवली आहे. या जागांच्या विक्रीनंतर गावात पारंपारिक पाउलवाटा, रस्ता समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावातील जमिनी परजिल्ह्यातील लोकांना न विकण्याचा ठराव करण्यात आला.www.konkantoday.com




