
शिरगाव येथे पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; गुन्हा दाखल..
रत्नागिरी शहरानजीकच्या मयेकरवाडी शिरगाव येथे कायदेशिर कर्तव्य बजावणार्या पोलिस कर्मचार्यावरच हल्ला चढवणार्याला अटक करण्यात आली. ही घटना सोमवार 8 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 ते 9.30 वा. कालावधीत घडली.
अमोल अवधुत मयेकर (रा. मयेकरवाडी शिरगाव, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात जखमी पोलिस कर्मचार्याने तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री संशयित अमोल मयेकर हा त्याचा चुलत भाउ समिर शशिकांत मयेकर याला सुरा काढून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे घाबरलेल्या समिरने शहर पोलिस ठाण्यात फोन करुन मदत मागितली.
शहर पोलिसांची डायल 112 ही गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. फिर्यादी पोलिस कर्मचार्याने कायदेशिर कारवाई करण्याच्या उद्देशाने संशयितला डायल 112 गाडीत मागे बसवून शहर पोलिस ठाण्यात येत असताना संशयित अमोल मयेकरने त्याच गाडीत मागे ठेवलेले हेल्मेट फिर्यादी पोलिस कर्मचार्याच्या डोक्यात जोरात मारले. यात त्यांच्या दातांना आणि तोंडाला जबर मार लागल्याने ते जखमी झाले. फिर्यादी हे कायदेशिर कर्तव्य करत असताना कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी संशयिताने त्याना शिवीगाळ करुन त्यांच्यावर हल्ला करुन दुखापत केली. तसेच मनाई आदेशादरम्यान सुरा बाळगून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा केली म्हणून त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली.




