
जनता, अधिकारी, आणि लोकप्रतिनिधी हे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचे माध्यम म्हणजे आमसभा : आमदार भास्कर जाधव
“आमसभा हा विषय जवळ-जवळ संपुष्टात येतो की काय ही भीती वाटते; परंतु मी मात्र या आमसभेची परंपरा कायम ठेवली आहे. एकाच वेळेला जनता, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचे एकमेव कारण आहे हे एकमेव माध्यम आहे,” अशी प्रतिक्रिया गुहागर येथील श्री पूजा मंगल कार्यालय येथे आमसभा झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली.
आमदार जाधव म्हणाले, “आमसभेत अधिकारी हे लोकांना डायरेक्ट उत्तरदायित्व ठरतात, लोकप्रतिनिधी जनतेला डायरेक्ट उत्तरदायित्व ठरतात आणि एक चांगल्या प्रकारची विकासाला गती मिळण्याच्या दृष्टीने या आमसभेचा उपयोग होतो म्हणून ही प्रथा आपण सोडलेली नाही.”
जलजीवन मिशनवर बोलताना ते म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडालेला आहे आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा पार बोजवारा उडालेला आहे. हे मी म्हणतो म्हणून नाही तर जे जलजीवन मंत्री आहेत गुलाबराव पाटील यांच्या दालनामध्ये मी मीटिंग घेतली आणि त्या ठिकाणी आपण हे पुराव्यानिशी आकडेवारीसह सिद्ध करून दाखवले आहे की जलजीवन मिशन ही योजना पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. फार मोठी अनियमितता आहे. नियमबाह्य काम मोठ्या प्रमाणात आहे आणि काम कमी आणि पैशाची उचल मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे हे मी त्यांच्या मीटिंगमध्ये त्यांच्या देखत सिद्ध करून दाखवले. यावर त्यांनी मंत्रालयातून एक चौकशी समिती नेमतो म्हणून सांगितले; परंतु ती चौकशी समिती नेमली नाही याचे कारण बारक्या फणसाला म्हैस जामीन आहे.”
विरोधी पक्षनेतेबाबत विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीविषयी बोलताना आमदार जाधव म्हणाले, “विधान परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते होते. त्यांची मुदत कालच्या ३१ ऑगस्टला संपलेली आहे आणि आमच्या तीन पक्षांच्या बैठकीमध्ये ती जागा काँग्रेसला द्यायचे हा आमचा निर्णय झालेला आहे. विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राहील आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते पद हे काँग्रेसकडे जाईल आणि म्हणून अंबादास दानवे यांची मुदत संपल्यामुळे ते काल उद्धव ठाकरे यांना भेटले, विधान परिषद सभापती राम शिंदेंना भेटले आणि आज जर ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर ते स्वाभाविक आहे कारण शेवटी हा निर्णय सरकारनेच करायचा आहे.”
संजय राऊत यांच्यावर नाराज असल्यामुळे बरेचसे आमदारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे, या प्रश्नावर बोलताना आमदार जाधव यांनी मी तुमाने कोण ते ओळखत नसल्याचे सांगितले.




