
‘लेझर लाईट’चा वापराबद्दल साताऱ्यात आठ जणांवर गुन्हा!
सातारा : गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत प्रशासनाने ठोस पावले उचलल्यानंतरही सातारा शहर येथे तीव्र प्रकाशझोताचा (लेझर लाइट) वापर केल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर फलटण येथे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीनंतर पोलिसांसमोरच दगडफेक झाल्याने १३ जणांना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलालाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे.
सातारा शहरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक ऐन बहरात असताना राजपथावर, राजलक्ष्मी चित्र मंदिरासमोर व गोल बागेजवळ राजवाडा रस्त्यावरून मिरवणूक असताना तीव्र प्रकाशझोताचा वापर करून प्रतिबंध आदेशाचा भंग केला. चार गणेशोत्सव मंडळांना ही यंत्रणा उपलब्ध करून देणाऱ्या मालकांवर प्रतिबंध असताना तीव्र प्रकाशझोताचा वापर करून मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश भक्तांचे डोळे दिपविले. त्यांच्या आरोग्याला त्रास दिला, या कारणास्तव आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात हवालदार सागर निकम यांनी गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, फलटण शहरात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन मंडळांत झालेल्या वादानंतर दगडफेकीचा प्रकार झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंकडील १३ जणांना अटक केली आहे.पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, हवालदार संदीप दिलीप लोंढे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. जिंती नाका येथे शिवशक्ती आणि जय भवानी तरुण मंडळाचे कार्यकर्ते आपापसात वाद घालत होते. त्या वेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारीचा प्रसंग उद्भवला. पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; त्यानंतरही कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ सुरू केली. काही क्षणांत प्रकरण चिघळले आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे.
साताऱ्यात दणदणाट
प्रशासनाच्या आवाहनानंतरही सातारा शहरातील राजपथावर राजलक्ष्मी चित्रमंदिर गोलबाग राजवाडा परिसरात अनेक मंडळांनी तीव्र प्रकाश झोत, तसेच ‘आवाजाच्या भिंतीं’चा (डॉल्बी) दणदणाट केला. काही मंडळांनी पारंपारिक वाद्यांना पसंती दिली, परंतु अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांना ध्वनिक्षेपकाचा मोह सोडता आला नाही. ‘आवाजाच्या भिंती’ लावत ही मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती. यंदा आवाजाची पातळी मोजण्यासाठी शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पथक मिरवणुकीमध्ये तैनात करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या मोजमापनुसार बहुतांश मंडळांच्या ‘आवाजाच्या भिंतीं’ वा वाद्य पथकांची आवाजाची मर्यादा ठरलेल्या पातळीहून जास्त होती. काही मंडळांपुढे या आवाजाच्या शंभर डेसिबलची मर्यादाही ओलांडली होती. या वाढत्या आवाजाच्या प्रदूषणामुळे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी मिरवणुकीतून काढता पाय घेतला.