जिंदल पोर्ट आणि चौगुले पोर्ट या ठिकाणी वेगवानपणे जाणाऱ्या मालवाहू वाहनामुळे दगड उडून दुचाकी स्वार जखमी


रत्नागिरी तालुक्यातील जयगड निवळी रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणाला याच रस्त्यावरून जिंदल पोर्ट आणि चौगुले पोर्ट या ठिकाणी वेगवानपणे जाणाऱ्या मालवाहू वाहनामुळे दगड उडून जखमी होण्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ओमकार अरुण देवरुखकर (वय ३०, रा. जयगड) असा जखमी तरुणाचे नाव आहे. जयगडकडे येणारी-जाणारी वाहतूक ही येथील स्थानिक नागरिकांच्या जीविताशी खेळणारी असल्यामुळे याबद्दल संबंधित लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी ही मागणी जनतेकडून होत आहे. अन्यथा या विरोधात आता जनता आंदोलन करून स्वतःच याचा सोक्षमोक्ष लावेल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जयगडच्या जिंदल पोर्ट आणि चौगुले पोर्ट या ठिकाणी जाणाऱ्या मालवाहू गाड्या ज्या सहसा ओवरलोडेड वाहतूक करतात. त्यांच्या सततच्या येण्या-जाण्यामुळे जयगड-निवळी रस्ता काही ठिकाणी प्रचंड नादुरुस्त झाला आहे. त्या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे साक्षात मृत्यूशी लपंडाव खेण्यासारखेच आहे. ऐन गणेशोत्सव सांगता होण्याच्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी जयगडमधील एक तरुण ओमकार अरुण देवरुखकर हा जीवघेण्या अपघातातून वाचला. सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ओमकार देवरुखकर हा चाफेरी गवळीवाडी या ठिकाणी आला असता बाजूने जाणाऱ्या वेगवान वाहनामुळे उडालेला दगड थेट त्याच्या डोळ्याच्या वरील भागात म्हणजे भुवईजवळ एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखा त्याला लागला. त्या ठिकाणी जखम झाली आणि रक्ताने त्याचा चेहरा माखला.
चाफेरी गवळीवाडी रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यावरचे काळे दगड सुटून सैल झाले आहेत. स्कूटरवरून जाणाऱ्या एकट्या दुकट्या नागरिकाला हे दगड लागून कधीही देवाचे बोलावणे येऊ शकते, अशी अवस्था आहे.

या अपघातानंतर पुन्हा एकदा परिसरातील स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे; मात्र याबाबत जिंदल कंपनी अतिउदासीन आहे. त्यांना त्यांच्या व्यापारापेक्षा नागरिकांच्या प्राणांची काहीच काळजी नाही. या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करणे आवश्यक असून देखील त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतर या जिंदल कंपनी प्रशासनाला आणि शासनाला जाग येणार आहे का ? एखाद्याच्या घरातील कमावता मुलगा किंवा व्यक्ती या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जर मृत्युमुखी पडणार असेल, जायबंदी होणार असेल, कायमची अपंग होणार असेल तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न संतप्त झालेल्या नागरिकांनी उपस्थित केला.

जयगडकडे येणारी-जाणारी वाहतूक ही येथील स्थानिक नागरिकांच्या जीविताशी खेळणारी असल्यामुळे याबद्दल संबंधित लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी ही मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. अन्यथा या विरोधात आता जनता आंदोलन करून स्वतःच याचा सोक्षमोक्ष लावेल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button