
गणपती उत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या चाकरमानी कुटुंबाचे पावणे चार लाखाचे दागिने चोरट्याने लांबविले
गणपती उत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या एका कुटुंबाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना ४ सप्टेंबरच्या रात्री ११ ते ५ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजेच्या दरम्यान चिपळूण तालुक्यातील मांडकी गावातील घाणेकरवाडी येथे घडली.या प्रकरणी, स्पेशल तानाजी घाणेकर (वय ३१) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घाणेकर हे मूळचे घाटकोपर, मुंबई येथील रहिवासी असून, गणेशोत्सवासाठी आपल्या कुटुंबासह गावी आले होते. त्यांनी सोबत आणलेले १५ तोळे ५ ग्रॅम ४०० मिली वजनाचे सोन्याचे दागिने एका बॉक्समध्ये भरून लोखंडी कपाटात काळ्या पिशवीत ठेवले होते.
फिर्यादी आणि त्यांचे कुटुंब घरात असतानाच, अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून आत प्रवेश केला. त्यानंतर, त्याने थेट कपाटातील पिशवीत ठेवलेले सर्व सोन्याचे दागिने चोरून नेले. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर घाणेकर कुटुंबीयांना धक्का बसला. तातडीने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे