
सरकारने दिले मोफत धान्य परंतु तेही उचलले नसल्याने २४ हजार लाभार्थ्यांचे होणार धान्य बंद
सलग सहा महिने रेशनवरील धान्याची उचल न केलेल्या १० हजार २२१ रेशनकार्डधारकांच्या २४ हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधितांचे धान्य प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना देण्यात येणार असून, त्यापूर्वी सर्वांची पडताळणी होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यभरात डिसेंबर २०२४ ते मे २०२५ या कालावधीत ३ लाख ३३ हजार ८८१ रेशनकार्डधारकांनी धान्य उचललेले नाही, असे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. योजनेचे लाभार्थी असूनही अनेकजण धान्य घेत नसल्याने हा गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने संबंधित धान्य बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड ३५ किलो धान्य, तर प्राधान्य योजनेतील प्रतिसदस्य ५ किलो धान्य मोफत दिले जाते. केशरी कार्डधारकांना हा लाभ मिळतो. मात्र धान्य उचल न करणार्या लाभार्थ्यांमुळे प्रतीक्षेत असलेल्यांना अडचण येत होती. आता त्यांच्या वाट्याला हे धान्य मिळू शकते.
www.konkantoday.com




