
दुर्वासचे वडील दर्शन पाटील यालाही चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात
दुर्वास पाटीलने केलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी पोलिसांनी युद्धपातळीवर सुरु केला आहे. मुख्य आरोपी दुर्वास आणि त्याचे तीन साथीदार सध्या पोलीस कोठडीत आहेत. ज्या ठिकाणी दोन खून झाले, तो सायली बार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील करण्यात आला आहे. तर दुर्वासचे वडील दर्शन पाटील यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सील करण्यात आलेल्या बारमधूनच मयत भक्ती मयेकर हिचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामुळे या प्रकरणात अजून काही माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. दुर्वासने आधी केलेल्या दोन खून प्रकरणातील एकामध्ये त्याचे वडील, अर्थात सायली बार चालक दर्शन पाटील याचाही सहभाग असल्याची प्रथमदर्शनी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्या दृष्टीने पोलीस यंत्रणा तपास करत आहे.




