
चिपळुणातील प्रभाग रचनेवर १९ जणांनी घेतल्या हरकती
चिपळूण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप अधिसूचनेनुसार प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेवर १९ जणांनी हरकत घेतली आहे. प्रभाग रचनेत झालेला बदल त्यांना मान्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावर ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नगर परिषदेने सुनावणी ठेवली आहे.
नगर परिषदेने जाहीर केलेल्या प्रारुप अधिसूचनेनुसार गोवळकोट गाव, गोवळकोट रोड, पेठमाप, उक्ताड, वाणीआळी, मुरादपूर-शंकरवाडी, मार्कंडी, काविळतळी-वांगडे मोहल्ला, राधाकृष्णनगर, रॉयलनगर, खंड-बाजारपेठ. पागमळा विरेश्वर कॉलनी, रावतळे-ओझरवाडी, पाग असे १४ प्रभाग झाले आहेत. पूर्वी १३ प्रभाग होते. त्यामुळे प्रत्येकी २ प्रमाणे २६ नगरसेवक निवडून येत होते. मात्र आता १ प्रभाग वाढल्याने नगरसेवकांची संख्या २८ होणार आहे. प्रभाग वाढल्याने साहजिकच पूर्वीच्या काही प्रभागांमध्ये किरकोळ बदल झाले आहेत. या बदलानुसार काही प्रभागांमधील भाग अन्य प्रभागांना जोडले गेल्याने मतांचे होणारे नुकसान लक्षात घेता काही माजी नगरसेवकांसह नागरिकांनी या प्रभाग रचनेवर हरकत घेतली आहे.www.konkantoday.com




