२५ वर्षीय दुर्वास पाटीलने दोन खून पचवले आणि हिंमत वाढल्यावर प्रेग्नंट प्रेयसीला गळा दाबून मारले


रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील युवतीच्या खून प्रकरणात अटक केलेला आरोपी दुर्वास पाटील याने आणखी दोन हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दुर्वास पाटील याचा हा खूनी खेळ गेल्या वर्षापासून सुरू होता. दोन जणांचे खून पचवल्यानंतर दुर्वास याला विरोध करणार्‍या त्याच्या प्रेयसी भक्तीचा खून करून तिचा मृतदेह आंबा घाटात फेकण्यापर्यंत निगरगट्ट दुर्वासने कृती केली. परंतु त्यावेळी ती गरोदर होती. त्यामुळे तिच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाला. परंतु भक्तीचा झालेला खून त्याला वाटले होते आपण इतर खुनाप्रमाणे सहज पचवू शकू परंतु तो खून तो पचवू शकला नाही.रत्नागिरी पोलिसांनी यामध्ये खोलवर तपास करून क्ररकर्म करणार्‍या दुर्वास पाटील याच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर हे हत्याकांड उघड झाले. तर तिच्याआधी आणखी दोघांना त्याने संपवलं होतं. हे सगळे खून दुर्वासच्या वडिलांच्या नावे असलेला सायली बारशी संबंधित असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दुर्वास आणि त्याचे साथीदार सध्या पोलीस कोठडीत आहेत.
भक्तीच्या खून प्रकरणाचा तपास सुरु असताना दुर्वास पाटील याने आधीही दोन खून केल्याचे समोर आले आहे. पहिला खून सीताराम वीर, ५०, वाटद-खंडाळा, तर दुसरा खून राकेश जंगम, २८, वाटद, खंडाळा याचा केला होता. दुर्वास पाटील याला अटक केल्यानंतर तो सराईत गुन्हेगारासारखा वागत होता. त्याच वेळेला पोलिसांचा संशय बळावला. वाटद खंडाळा येथील आणखी एक व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्याचा तपास सुरु असतानाच राकेश जंगम या बेपत्ता तरुणाचाही दुर्वास यानेच खून केल्याचं समोर आलं. पोलिसांनी चौदावं रत्न दाखवताच त्याने या सगळ्या खुनांची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती आहे.
दुर्वास पाटील याने पहिला खून ५० वर्षीय सीताराम वीर यांचा केला. ते दुर्वास पाटीलच्या वडिलांच्या नावे असलेल्या सायली बारमध्ये कामाला होते. त्यांचा मुलगा अमित वीर याने या प्रकरणी तक्रार दाखल केली.
खरं तर मयेकर हिला सीताराम वीर हे फोनवर बोलून त्रास देतात, या रागातून दुर्वासने अन्य दोघांशी संगनमत करुन हाती आणि काठीने त्यांना मारहाण केली. परंतु त्यांना चक्कर आली आहे असे सांगून रिक्षा करून घरी पाठवलं, मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात दुर्वास दर्शन पाटील, विश्वास विजय पवार हे आरोपी होते.
दुर्वासने दुसरा खून केला २८ वर्षीय राकेश जंगम याचा. राकेशला सीताराम वीर यांच्या खुनाची माहिती होती. राकेशने घरी आईला सांगितले होते. ६ जून २०२४ रोजी तो कपड्याची बॅग आणायला जातो, असे सांगून घरातून गेला होता. पण तो कधी परतलाच नाही. आईने तो बेपत्ता असल्याची फिर्याद जयगड पोलिस ठाण्यात दिली होती. राकेशला आपण कोल्हापूरला जाऊया असा खोटा बहाणा करुन दुर्वास पाटील आणि नीलेश भिंगार्डे यांनी आंबाघाटात नेऊन खून केला आणि त्याचा मृतदेह टाकून दिला. एक वर्षभर बेपत्ता राहिल्याने दुर्वास निर्धास्त झाला होता.दुर्वासने तिसरा खून केला २६ वर्षीय मैत्रीण भक्ती मयेकर हिचा. दुर्वासच्या डोक्यात भक्तीला जीवे मारण्याचा कट सायली बारमध्येच रचला. आंबा घाट हे निर्जनस्थळ असल्याने या ठिकाणी मृतदेह टाकल्यास सापडणार नाही अशी त्याला खात्री होती. त्याप्रमाणे बारवर असलेल्या रुममध्ये केबलने गळा आवळून भक्तीचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचाही मृतदेह आंबाघाटात रात्रीच्या वेळी फेकून दिला. बेपत्ता असलेल्या भक्तीचा खून झाल्याचे तब्बल दहा दिवसानंतर उघड झालं.
जणू काही घडलंच नाही या आविर्भावात दुर्वास पाटील फिरत होता. भक्तीच्या भावाने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि संशय निर्माण झालेल्या दुर्वास पाटील यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यानंतर या सगळ्या प्रकरणांना आता वाचा फुटली आहे. त्याच्यासोबत विश्वास पवार व निलेश भिंगार्डे यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत दुर्वासने एकामागोमाग एक खुनांची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. बारच्या माध्यमातून हातात पैसा खेळत होता. दुर्वास पाटील याच्या घरातून पोलिसांनी हॉकी स्टिक व काही हत्यार ताब्यात घेतल्याचे समजते. या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button