
राजापूर तालुक्यातील पन्हळे तर्फे सौंदळ येथे विदेशी गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि ट्रक कंटेनर असा एकूण २ कोटी ३६ लाख ७२ हजार २८० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई या पथकाने मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील पन्हळे तर्फे सौंदळ येथील निनादेवी मंदिर येथे कारवाई करताना विदेशी गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि टाटा कंपनीचा दहाचाकी ट्रक कंटेनर असा एकूण २ कोटी ३६ लाख ७२ हजार २८० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईमुळे अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारुसाठ्याची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कंटेनरमधून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक केली जात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक , मुंबईने राजापूर तालुक्याच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर पन्हळे तर्फे सौंदळ येथील निनादेवी मंदिर येथे दि. १ सप्टेंबर रोजी पाळत ठेवली होती. यावेळी सदर जागेतून विनापरवाना गोवा राज्य विदेशी मध्याची वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीचा कंटेनर ट्रक (क्र.आरजे -१४-जीके-९४६४) हा पकडला होता. यामध्ये जप्त करण्यात आलेल्या गोवा बनावटी विदेशी मद्याचे १८६६ बॉक्स आणि टाटा कंपनीचा ट्रक कंटेनर असा एकूण २ कोटी ३६ लाख ७२ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी कंटेनर चालक आसिफ आस मोहम्मद
याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए) (इ) ८१, ८३ व ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.