
जीआरचा टाचणी एवढाही फायदा नाही, नवीन काहीच नाही; विनोद पाटील
सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या जीआरचा टाचणी एवढाही फायदा आणि उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही नवीन मिळालं नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिका करते आणि आंदोलन विनोद पाटील यांनी दिलीय.मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे येऊन या जीआरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे, असंही विनोद पाटील म्हणाले.
मागच्या वेळेस गुलाल एकनाथ शिंदे यांनी खेळला, याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं नाही. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुलाल खेळला याचे उत्तर त्यांनी द्यावे, असं आव्हान देखील विनोद पाटील यांनी केल आहे. तसेच 100 पैकी या जीआरला मी मायनस झिरो मार्क्स देईल, असंही विनोद पाटील म्हणाले.
छाती ठोकपणे सांगतो, एकाचही सर्टिफिकेट निघणार नाही- विनोद पाटील
समाज माझ्याकडे अपेक्षेनने बघतो. मी न्यायालयीन लढाई लढलो. छाती ठोकपणे सांगतो यातून एकाचही सर्टिफिकेट निघणार नाही. मागणारे मागत असतात मात्र समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी मला जीआरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे. आज हा जो कागद दिलाय याची जबाबदारी विखे पाटील यांनी घ्यावी आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टता द्यावी, असंही विनोद पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना मी श्रद्धांजली देऊ शकलो नाही, याची आम्हाला खंत वाटते, असंही विनोद पाटील यांनी सांगितले.




