
मुंबई-चिपी विमानसेवेचा अजूनही पत्ता नाही…
चिनी-सिंधुदुर्ग विमानतळावर गणेश चतुर्थीच्या काळात ’फ्लाय ९१’ कंपनीने उत्कृष्ट विमानसेवा देत पुणे व हैद्राबाद येथून १८०० चाकरमान्यांना कोकणात आणले, तर दुसरीकडे मुंबई-चिपी विमानसेवा मंत्रीमहोदयांच्या आश्वासनांप्रमाणे हवेतच घिरट्या घालत राहिली. मुंबई-चिपी विमानसेवा गणेश चतुर्थीत सुरू करण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरले, तर खासगी ’फ्लाय ९१’ या विमान कंपनीने भर पावसात, खराब हवामान असतानादेखील उत्कृष्ट सेवा देत प्रवाशांना आपल्या निश्चितस्थळी सिंधुदुर्ग विमानतळावर पोहोचविले.
तांत्रिक कारणांमुळे बंद असलेली मुंबई-चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला, असे गणेश चतुर्थी अगोदर जाहीर करण्यात आले होते. यामुळे विमानाने मुंबईहून सिंधुदुर्गात जाता येईल, या आशेवर असलेल्या कोकणवासियांची निराशा झाली.
गणेशोत्सवाआधीच कोकणवासीयांना बाप्पा पावला, अशी आशा दाखविल्याने आपल्या गावी जाता येणार, अशा अपेक्षा ठेवलेल्या चाकरमान्यांचा अपेक्षाभंग झाला.
विशेष म्हणजे, सर्वसामान्यासाठी परवडणार्या दरात ही सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे, असेही जाहीर करण्यात आले होते. अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड राज्य सरकार उचलणार असून या मार्गावरील तिकिटाचे प्रती आसन ३ हजार २४० रुपये शासनातर्फे विमान कंपन्यांना दिले जाणार आहेत, असेही सांगितले होते.
www.konkantoday.com