
पाच सप्टेंबरला रत्नागिरीत ‘नैसर्गिक शेती’ विषयावर कार्यशाळा
रत्नागिरी : नैसर्गिक शेतीमधून विषमुक्त आधुनिक भारताची निर्मिती या विषयावरील शेती कार्यशाळा पाच सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील नाचणे येथे आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या मिशन ऑरगॅनिकचे संस्थापक राहुल टोपले या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. दुर्गवाडी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील कै. सीताराम नारायण देशपांडे यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकीच हा एक उपक्रम आहे. कै. देशपांडे यांचे नातू आणि मुंबई हायकोर्टात कार्यरत असलेले वकील प्रसाद शांताराम देशपांडे यांच्या सौजन्याने दुर्गवाडी येथील कृतज्ञता मंचाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. नाचणे-गोडाउन स्टॉप येथील साई मंदिर हॉलमध्ये दुपारी दोन ते पाच या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम शिक्षकदिनी होणार आहे. त्यामुळे त्या दिवसाचे औचित्य साधून याच कार्यक्रमात समीर चंद्रकांत कालेकर यांना उत्कृष्ट क्रीडाशिक्षक म्हणून जिल्हास्तरीय क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरवले जाणार असल्याची माहितीही कृतज्ञता मंचाकडून देण्यात आली. कालेकर हे चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
कै. सीताराम देशपांडे यांचे पुत्र श्री. शांताराम सध्या वयाच्या नव्वदीत असून, त्यांनी आपल्या वडिलांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त आपल्या (साईनगर, कुवारबाव येथील) घरी साप्ताहिक मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे उद्घाटन याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाले. सुखाई आरोग्य सेवा आणि समुपदेशन केंद्र या नावाने सुरू झालेल्या या केंद्रात दर मंगळवारी गरीब-गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली जात असून, आवश्यकतेनुसार मोफत समुपदेशन सेवा पुरवली जात आहे.




