
संगमेश्वर जवळ आरवली येथे भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर आरवली (ता. संगमेश्वर) येथे रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मिनी बस व कारचा झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह दोन लहान मुलांसह चौघेजण गंभीर जखमी झाले.
गुहागरहून प्रवासी सोडून परत येत असलेली मिनी बस (क्रमांक MH 04 LY 6676) चालक रवी अरुण झाल्टे याचे अवघड वळणावर नियंत्रण सुटल्याने पेट्रोल पंपाशेजारी दुभाजकावर आदळली आणि थेट पंक्चर काढणाऱ्या दुकानात घुसली. त्याचवेळी दुकानाबाहेर उभी असलेली मारुती व्हॅगनआर (MH 02 BJ 1512) बसच्या धडकेत चेंगराचूर झाली.
कारमध्ये कल्पेश घडशी (३२), रुद्रा रुपेश घडशी (२९), ऋग्वेद कल्पेश घडशी (५) आणि कियारा रुपेश घडशी (३) हे बसलेले होते. गणेशोत्सवासाठी मूळगाव आंबव पोंक्षे येथे आलेले घडशी कुटुंब अंत्रवली येथे नातेवाईकांकडे जात असताना कारला पंक्चर झाल्यामुळे ते पेट्रोल पंपाजवळ थांबले होते. त्याचवेळी हा अपघात घडला.
अपघातानंतर बसचालक व त्याचा सहकारी जंगलात पळून गेले. मात्र बसमधील कागदपत्रांसह चालकाचा परवाना पोलिसांच्या हाती लागला आहे. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.




