रत्नागिरी जिल्ह्यात गौराईचे उत्साहात आगमन

रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून, आता माहेरवाशीण असलेल्या गौराचेही सर्वत्र उत्साहाच्या वातावरणात आगमन झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक घरांमध्ये गौराईचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावर्षी, सोमवार १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाणार आहे. कोकणात गौरी सणाला वेगळे महत्त्व आहे. गौरीला साक्षात महालक्ष्मीचे रूप म्हणून ओळखले जाते. सौभाग्य आणि समृद्धीची देवता म्हणून विवाहित स्त्रिया या सणात मोठ्या भक्तिभावाने गौराईचे पूजन करीत असतात. गौराईचे पूजन कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी करण्यात येते.
जिल्ह्यात गौराई पूजनाचा उत्सव तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पहिल्या दिवशी गौरी आवाहन म्हणजेच गौरीला घरी आणले जाते. यावेळी नदी किंवा तलाव अशा पाणवठ्याच्या ठिकाणंचे खडे आणून त्यांची पूजा केली जाते. मुखवट्याची व हात पाय असलेल्या मूर्तीची स्थापना यावेळी करण्यात येते.
दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाचा कार्यक्रम केला जातो. यावेळी गौरीला नवीन वस्त्र, दागिने आणि इतर सौभाग्य अलंकार अर्पण करून तीची पूजा केली जाते. या दिवशी पाच प्रकारच्या भाज्या आणि विविध पक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी गौरी सणाला मांसाहारी नैवेद्य दाखविला जातो. यावर्षी गौराईचे आगमन पूर्वनक्षत्रावर झाल्याने अनेक घरांमध्ये नवविवाहित वधूंचा पहिला ‘ओवसा’ भरण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. हा एक सौभाग्य प्राप्त करण्याचा महत्त्वाचा विधी मानला जातो. तसेच तिसऱ्या दिवशी, मूळ नक्षत्रावर, गौरी विसर्जन करुन मोठ्या भक्ती भावाने गणेशाला व गौरीला निरोप दिला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button