
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे माजी मनसे नेते वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे वैभव खेडेकर यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाने केलेल्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर वैभव खेडेकर कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनी निर्णय घेतला. वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर असून ते ४ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या खेडचे मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना पक्षाने बडतर्फ केल्यानंतर ते येत्या ४ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये रविंद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपास्थित शेकडो कार्यकर्त्यांसह वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांच्या पक्ष प्रवेशानंतर आता मनसेचे वैभव खेडकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वैभव खेडेकरांच्या प्रवेशानंतर कोकणात भाजप पक्ष वाढीला बळ मिळू शकतं. त्याचसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढणार आहे.




