
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ‘श्रीगणेशा आरोग्याचा.. ‘जिल्ह्यात 53 ठिकाणी समुदाय आरोग्य शिबीरे ; 39 ठिकाणी नियोजन
रत्नागिरी, दि.1 ) : मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळात 53 ठिकाणी समुदाय आरोग्य शिबीरे घेण्यात आली असून 39 ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी श्री गणेश उत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य शिबीर आयोजित करण्याबाबत लेखी पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी यासंदर्भात सार्वजनिक गणेश मंडळे आणि आरोग्य विभाग यांची बैठक घेतली होती. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधित 92 ठिकाणी समुदाय आरोग्य शिबीरांचे नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील 53 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ही शिबीरे घेण्यात आली आहेत.
रत्नागिरी तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल, परकार हॉस्पीटल, श्री रामनाथ हॉस्पीटल, लायन्स हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय, राजापूर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय राजापूर, खेड तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय कळंबणी, रॉयल हॉस्पीटल, घरडा हॉस्पीटल, परशुराम हॉस्पीटल, एसएमएस हॉस्पीटल, एमईएसएएम परशुराम रुग्णालय,मंडणगड तालुक्यात ग्रामीण रुग्णालय मंडणगड, देवरुख मध्ये ग्रामीण रुग्णालय देवरुख, दापोलीत उपजिल्हा रुग्णालय दापोली, योगीता दंत महाविद्यालय व रुग्णालय, लांजामध्ये ग्रामीण रुग्णालय लांजा, चिपळूणमध्ये लाईफकेअर हॉस्पीटल, श्री हॉस्पीटल, वालावलकर रुग्णालय यांच्या माध्यमातून ही समुदाय आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली.
जिल्ह्यातील ऊर्वरित 39 ठिकाणी ही समुदाय शिबीरे होणार असून, त्याबाबत नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्यावतीने देण्यात आली.
000




