
डोंबिवलीत “चिरेबंदी वाडा” बाप्पासाठी सजला
मंडणगडच्या राहुल महाडिक यांची कलाकृती गणेशभक्तांना भावली


ठाणे : माणुसकीचा ओलावा निर्माण करणारी,आपुलकीचे प्रतीक म्हणजेच कोकण भूमी. प्रत्येकाच्या मनामनात, कणाकणात सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य रुजलेली इथे पाहायला मिळते. त्यात अधिक एकरूपता आणणारा “चिरेबंदी वाडा” येथील जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण भाग समजला जातो; परंतु काळाच्या ओघात ही जीवनशैली कुठेतरी मागे पडली; मात्र आज हीच जीवनशैली आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाला हवी हवीशी वाटत आहे. कोकणचे हेच सांस्कृतिक वैभव आणि गेल्या अनेक पिढ्या, वाडवडिलांनी अनुभवलेली ही जीवनशैली जगासमोर आणण्याचे प्रयत्न सोवेली (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) गावचे सुपुत्र राहुल रवींद्र महाडिक या युवकाने गणेशोत्सवात गणपती आरास मधून केला आहे.
डोंबिवली (दावडी) येथे वास्तव्यास असणारा राहुल महाडीक हा युवक कोणत्याही कलेचे शिक्षण नसताना केवळ आत्मविश्वासाच्या बळावर गेली चार वर्षे सातत्याने गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या कलाकृती साकारून आरास बनवत असून यावर्षी गणेशोत्सवात त्याच्या नवीन संकल्पनेतून कोकणातील एकरूपता असणाऱ्या जीवनशैलीवर पर्यावरणपूरक अशी “चिरेबंदी वाडा” ही कलाकृती साकारून अवघ्यांचे लक्ष वेधले आहे.
ही गणपती बाप्पाची आरास राहुल याने त्याचे मित्र कुणाल नामदेव सरनोबत (रा. दावडी गाव, डोंबिवली (पूर्व)) यांच्या घरी साकारली आहे.
काल्पनिक “चिरांचा वाडा” आरासमध्ये पूर्वी असलेली एकत्रित कुटुंब पध्दती आणि पूर्वीच्या काळात दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या वस्तू ज्या आताच्या डिजिटल युगाच्या तंत्रज्ञानातून लुप्त होत चालल्या आहेत त्यांची जागा ही इलेक्ट्रिक वस्तूंनी घेतली आहे अशा वस्तू जसे की जाते, पाटा- वरवंटा, काठवट, केरसुणी, उखळ, रांजण, सुप आदींची मांडणही यात केली आहे. ही आरास घराच्या हॉलमध्ये २२×१२ फिट मध्ये साकारण्यात आली आहे.
लाकडी टेबल, लाकडी रिपा, लाल मातीची कौल, जाते, उखळ, हत्यार, रांजण, काठवट, पाटा-वरवंटा, अशा पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर तसेच वॉटर कलर वापरून केली आहे.
विशेष म्हणजे बाप्पाची आरास साकारताना घराच्या कोणत्याही भिंतीचा आधार न घेता पूर्ण रीपांच्या आधारे उभी केली आहे. ही आरास कलाकृती साकारण्यास २५ दिवसांचा कालावधी लागला असून रोजचे ४ ते ५ तास देऊन पूर्ण केली आहे.
या महत्त्वपूर्ण बाप्पाच्या आराससाठी माझे सहकारी हेमंत सरनोबत, श्याम सरनोबत, करण विशे आणि मित्र परिवार यांच्या सहकार्याने आणि लाडक्या बाप्पाच्या कृपेने आरास साकरण्यात यश आल्याचे राहुल याने सांगितले. कोणतीही कला अवगत नसताना या गणपती बाप्पाच्या आरासमधून कोकणच्या चिरेबंदी वाड्याची जीवनशैली व कोकणच्या सांस्कृतिक वैभवाचे यशस्वी अशी “चिरांचा वाडा” कलाकृती साकारत जगाला दर्शन घडविले त्याबद्दल राहुल महाडिक याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




