
सेवा मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांचा बंद असलेली ओला कंपनीची शोरूम उघडताच कर्मचाऱ्यांना घेराव
सगळीकडे इलेक्ट्रिक बॅटरी वरील स्कूटरचा जमाना सुरू झाल्यावर रत्नागिरीत अनेकांनी लाखो रुपये खर्चून ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेतल्या होत्या त्यानंतर काही महिन्यांनी हळूहळू या स्कूटर नादुरुस्त होऊ लागल्या मात्र दरम्याने ओलाची असलेले शोरूम बंद करण्यात आली होती
रत्नागिरीतील ओला शोरूम अनेक महिन्यांपासून बंद ठेवून अचानक पुन्हा सुरु केल्यानंतर बुधवारी ग्राहकांनी संतापाचा स्फोट घडवला. आक्रमक झालेल्या ग्राहकांनी थेट शोरूममध्ये घुसून कर्मचाऱ्यांना जाब विचारला. या गोंधळात एका ग्राहकाने गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने पेट्रोल टाकून शोरूम पेटवून देण्याची धमकी दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर ग्राहकांची समजूत काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
काही महिन्यांपूर्वी ओला कंपनीकडे रत्नागिरीत वाहन विक्री करण्याचा परवाना नसल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने हे शोरूम बंद केले होते. मात्र या काळात शेकडो ग्राहकांकडे ओला दुचाकी गाड्या असल्याने त्यांची मोठी अडचण झाली होती. कंपनीकडून ‘फ्री सर्व्हिसिंग’चे आश्वासन देऊन विक्री करण्यात आलेल्या गाड्या शोरूम बंद पडल्याने दुरुस्तीशिवाय पडून राहिल्या. इतर कोणतेही मेकॅनिक या गाड्या दुरुस्तीसाठी घेत नसल्याने ग्राहक अक्षरशः हैराण झाले होते.
लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या गाड्यांची दुरुस्ती कशी करायची असा ग्राहकांसमोर प्रश्न उभा राहिला. दरम्यान शोरूम बंद करतानाही किंवा पुन्हा सुरु करतानाही कंपनीने ग्राहकांना कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे अनेक दिवस बंद असलेली शोरूम उघडल्यावर ग्राहकानी तेथे गर्दी करून गोंधळ घातला




