
सुवर्ण व्यावसायिकाच्या लुटीप्रकरणी पोलीसांकडून संशयिताचे रेखाचित्र जारी
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील सुवर्ण व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांच्याकडील १४ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने लुटण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला होता.या लुटीप्रकरणी देवरूख पोलीसांकडून संशयिताचे रेखाचित्र जारी करण्यात आले असून संशयिताचा शोध घेतला जात आहे.
देवरूखातील प्रसिद्ध धनंजय केतकर या सुवर्ण व्यावसायिकाचे दोन कारमधून आलेल्या १० जणांनी अपहरण करून त्यांच्याकडील १४ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने व २० हजाराची रोख रक्कम असा ऐवज लुटला होता. ही घटना देवरूख-साखरपा मार्गावरील वांझोळे येथे घडली होती. या घटनेने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या लुटीच्या घटनेनंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख पोलीसांनी तात्काळ अज्ञातांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत. तसेच धनंजय केतकर यांच्या जबाबानंतर पोलीसांनी संशयिताचे रेखाचित्र काढले असून ते प्रसिद्ध केले आहे. तयार केलेल्या रेखाचित्रानुसार पोलीसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे. लवकरच संशयिताला गजाआड करण्यात येईल असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.




