
चिपळुणात चिकन, मटणसह चायनीज सेंटरना देणार नोटिसा
भटक्या कुत्र्यांना टाकाऊ अवशेष, उरलेले जेवण उघड्यावर टाऊ नये, अशा सूचना देणारी नोटीस नगर परिषद लवकरच चिकन, मटन, मच्छी, चायनीज सेंटर, हॉटेल मालकांना देणार आहे. तसे केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात येणार आहे. तर ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांनाही आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. भटके कुत्रे उपाययोजना बैठकीत नागरिक व प्राणीमित्र यांच्यात झालेल्या खडाजंगीनंतर प्रशासन ’ऍक्शन’ मोडवर आले आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांच्या गंभीर समस्येबाबत बुधवारी नागरिक, प्राणीमित्र यांची बैठक घेतली. त्यात उपाययोजना सुचवण्याऐवजी खंडाजंगी झाली. त्यामुळे कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मात्र बैठकीच्या सुरूवातीला कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला उघड्यावर चिकन, मटण, मच्छीचे टाकाऊ अवशेष टाकणारे काही विक्रेते, उरलेले जेवण टाकणारे हॉटेल व्यावसायिक, चायनीज विक्रेते व कचरा टाकणारे नागरिक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता.
याची मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी गंभीर दखल घेतली असून असे कृत्य करू नये म्हणून सर्वांना नोटिसा देण्यात येणार आहेत. तरीही त्यांनी तसे केले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही नोटीसीद्वारे देण्यात येणार आहे. तसेच कुत्र्यांना खायला कोठे टाकावे, याबाबत न्यायालयाने केलेल्या सूचनांचा अभ्यास करून तशी ठिकाणेही ठरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जे नागरिक घंटागाड्यांची वाट न पाहता उघड्यावर कचरा टाकतात, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खास पथक तयार केले जाणार आहे. या पथकाला जे नागरिक सापडतील त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच भटक्या कुत्र्यांबाबत त्यांनी नेमके काय करावे, याच्या सूचनाही त्यांना ध्वनीक्षेपकाद्वारे दिल्या जाणार आहेत. त्याची तयारी सध्या केली जात आहे..www.konkantoday.com




