
आंबा घाटात वाढते घातपाताचे प्रकार होत असल्याने परिसरात पोलीस चौकीची मागणी
सध्या आंबा घाट रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाग असताना देखील गेल्या काही महिन्यांपासून या घाटात घातपाताचे प्रकार वाढले आहेत. घाट माथ्यावर खून करून व्यक्तीचा मृतदेह थेट आंबा घाटात टाकल्याच्या एक ना अनेक घटना याआधी घडल्या आहेत. आंबा घाटातील सुमारे १५ ते २० किलोमिटर परिसर निर्जन आहे. त्याचा फायदा गुन्हेगारांकडून घेतला जातो. या गुन्ह्यांना आळा घालायचा असेल तर आंबा घाट हद्दीत पोलीस चौकीची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हयांना जोडणारा आंबा घाट हा महत्वाचा मार्ग आहे. हा घाट उंच डोंगर व घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. एका बाजूला उंच कडा दर दुसर्या बाजूला हजारो फूट खोल दरी असे चित्र आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या घाटाला महत्व आहे. डोळ्याचे पारणे फेडणारे असे नयनरम्य दृष्य घाटात
आहे. मात्र या घाटाचा गुन्हेगारांकडून दुरुपयोग केला जात असल्याचे उघड होत आहे. इतर जिल्ह्याच्या भागात विविध कारणांवरून एखाद्या व्यक्तीचा खून करून मृतदेह आंबा घाटात टाकला जात आहे. अशा प्रकारच्या एक ना अनेक घटना घडल्या असून वर्षागणिक यामध्ये वाढ होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
www.konkantoday.com




