
मनोज जरांगे पाटलांशी थेट चर्चा करण्यासाठी शिंदे समिती आझाद मैदानात
सरसकट मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज शिंदे समितीने आझाद मैदानात जात भेट घेतली.या भेटीमध्ये शिंदे समितीकडून आजवर करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला व सरकार काय करणार या संदर्भातील माहिती देण्यात आली. मात्र, शिंदे समितीकडून जे मुद्दे मांडण्यात आले त्याला बहुतांश मुद्द्यांना जरांगे पाटील यांनी विरोध केला. सरसकट मराठे कुणबी ठरत नसतील तर मग सरसकट जात ओबीसीमध्ये समावेश कशी केली जाते? अशी विचारणा जरांगे पाटील यांनी केली. दरम्यान, एखाद्या जातीला ओबीसी ठरवण्याचा अधिकार या समितीचा नसल्याचं शिंदे समितीने जरांगे पाटील यांना सांगितलं.
सरसकट समाजाला दाखला मिळू शकणार नाही
शिंदे समितीने एखाद्या व्यक्तीला जातीचा दाखला मिळू शकेल. मात्र, सरसकट समाजाला दाखला मिळू शकणार नाही सांगितलं. सर्व मराठ्यांना कुणबी ठरवता येणार नाही असे शिंदे समितीने जरांगे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम राहताना जोपर्यंत मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर निघत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, असे स्पष्ट केले. जीआर काढण्यासाठी कोणतीही मुदत देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मराठवाड्यामधील मराठे कुणबी तत्वत: मान्य असल्याचं शिंदे समितीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.




