
चिपळूण शहरातील इतिहासाच्या खुणा हटत आहेत
दोन ठिकाणांमधील अंतर दर्शवण्यासाठी शहरातील जुन्या कोयना रस्त्यावर मैलाचा दगड अर्थात ’माईलस्टोन’ बसवण्यात आला होता. अलीकडे स्वामीमठ ते महाराष्ट्र हायस्कूल हा नवा रस्ता करतेवेळी कोयना रस्त्याची साक्ष देणारा हा दगड हटवण्यात आला. सध्या हा दगड जलतरण तलाव परिसरात अडगळीत पडून आहे. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची मागणी इतिहासप्रेमींमधून होत आहे.
पूर्वी वाहतुकीच्यादृष्टीने दाभोळखाडीमार्गे गोळकोट धक्का हे मुख्य केंद्रबिंदू होते. ज्यावेळी कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात झाली त्यावेळी प्रकल्पासाठी असणारी साधनसामग्री मुंबईतून पुढे दाभोळखाडीमार्गे गोळकोट धक्का येथे येत असे. पुढे ही साधनसामग्री कोयना येथे नेण्यासाठी गोवळकोट, पेठमाप, मुरादपूर असा जुना कोयना रस्ता तयार करण्यात आला. आताच्या जलतरण तलावासमोरील भागात त्या वेळी एक मैलाचा दगड बसवण्यात आला होता. या दगडावर चिपळूण तसेच १२ नंबर क्रमांक असून एक अक्षर अस्पष्ट झाले आहे. या जुन्या कोयना रस्त्यावर अलीकडे स्वामीमठ ते महाराष्ट्र हायस्कूलपर्यंतचा नवा रस्ता करण्यात आला. यावेळी जुन्या कोयना रस्त्याची साक्ष देणारा मैलाचा दगड हटवण्यात आला. सध्या हा दगड तलावासमोरील भागात अडगळीत पडला आहे. या दगडाचा वरील भाग तुटलेला आहे.
www.konkantoday.com