गणपती सणानिमित्त मुंबईहून गावी आलेल्या एका तरुणाचा तळसर कदमवाडी येथील विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू


गणपती सणानिमित्त मुंबईहून गावी आलेल्या एका तरुणाचा तळसर कदमवाडी येथील विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. महेश विष्णू कदम (वय २६) असे या मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण तळसर कदमवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. शिरगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मूळचा तळसर कदमवाडी येथील रहिवासी असलेला महेश कदम, हा शेतकरी विष्णू कदम यांचा सर्वात लहान मुलगा होता. दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केल्यानंतर तो नोकरीसाठी मुंबईला गेला होता. बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये तो गेल्या आठ वर्षांपासून ‘कूक’ म्हणून काम करत होता. गणपती सणासाठी दोन दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महेश जेवण करून आई-वडिलांसोबत गप्पा मारत बसला होता. त्याचवेळी गावातील काही मित्र त्याला गावातील विहिरीत पोहण्यासाठी घेऊन जाण्यासाठी आले. आई-वडिलांनी त्याला विहिरीत न जाण्याचा आग्रह केला, मात्र मित्रांच्या आग्रहामुळे तो त्यांच्यासोबत गेला. ही विहीर खूप खोल असल्याने धोकादायक मानली जाते.

साधारणपणे दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास महेशने विहिरीत उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहून मित्रांनी एकच गोंधळ घातला. मदतीसाठी आरडाओरड झाल्याने गावातील लोक तात्काळ घटनास्थळी धावले. याचवेळी महेशचा भाऊ योगेश कदम यालाही माहिती मिळताच तो विहिरीकडे धावला. समोरचे दृश्य पाहून त्याला मोठा धक्का बसला. गावकऱ्यांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ गळ टाकून महेशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button