
’आरोग्या’च्या पथकांचा प्रवाशांना आधार, २२३ जणांवर उपचार केले
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यातून येणार्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आरोग्य विभागाने २० ठिकाणी तत्काळ उपचारासाठी ठेवलेल्या पथकांमार्फत २२३ जणांवर उपचार केले. त्यातील तीन जणं हिवतापाचे संशयित असल्यामुळे त्यांचे नमुने घेण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत राहिलेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी – रत्नागिरी, सिंधुदुर्गतील गावाकडे येतात. त्यासाठी रेल्वे, एसटी व खासगी गाड्यांचा उपयोग करतात. यंदा गेल्या चार दिवसात सुमारे एक लाखांहून अधिक चाकरमानी रत्नागिरीत आले आहेत. या कालावधीत प्रवासी आजारी पडल्यास, दुखापत झाल्यास त्यांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर ८ आणि अन्यत्र १२ आरोग्यपथके तैनात केली होती. त्या पथकांच्या ठिकाणी आरोग्य अधिकारी, नर्स मदतीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्याचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यात येणार्या सुमारे २२३ जणांना झाला. त्यामध्ये ताप आलेल्या प्रवाशांचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले आहेत. पावसाचा जोर कमी असल्यामुळे मुंबईमध्ये आजाराच्या साथींचे प्रादुर्भाव तेवढासा नाही; मात्र ताप, सर्दी, खोकलासारख्या आजारांचे बाधित मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.www.konkantoday.com




