अनंत अंबानी यांच्या गणपतीला वेगळा नियम? पाच फुटांच्या मूर्तीचे समुद्रात विसर्जन!


मुंबईत गुरुवारी दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पार पडले. त्या वेळी सरसकट सर्वच लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. मात्र प्रख्यात उद्योगपती अनंत अंबानी यांच्या घरातील गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि अंबानी कुटुंबाला वेगळा न्याय कशाला, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गुरुवारी पार पडले. न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा सहा फुटांपर्यंतच्या पीओपीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात व त्यापेक्षा उंच मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्यात येणार आहे. दीड दिवसांच्या सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. मात्र यावरून अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती होती. वादावादी, भांडणे, गोंधळात यंदा दीड दिवसाचे गणपती विसर्जन पार पडले.

यंदा पीओपीच्या लहान मूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने २९० कृत्रिम तलाव तयार केले होते. मात्र सरसकट सगळ्याच मूर्तींचे यंदा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. अनेक ठिकाणी शाडू मातीच्या मूर्तीही कृत्रिम तलावातच विसर्जित करण्याची जबरदस्ती पालिकेचे पथक भाविकांवर करीत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी भाविकांची पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबर वादावादी झाली. पोलिसांच्या उपस्थितीत विसर्जन होत असल्यामुळे भविकांना फार विरोध करता आला नाही. मात्र शाडू मातीची मूर्ती असूनही समुद्रात विसर्जन करायला न दिल्यामुळे अनेक भाविक संतापले. असे असताना गिरगांव चौपाटीवर अनंत अंबानी यांच्या घरातील पाच फूट उंचीच्या गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी दिल्यामुळे भविकांमध्ये नाराजी पसरली आहे. गिरगांव चौपाटीवर सात कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून घरगुती गणेश मंडळांना समुद्रात जाऊच देत नव्हते. त्यामुळे ही नाराजी अधिक तीव्र झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढलेल्या परिपत्रकानुसार यंदा पर्यावरणपूरक मूर्तीही कृत्रिम तलावातच विसर्जित केल्या जात होत्या.

दरम्यान, शाडू मूर्तींसाठी लढा देणारे वसंत राजे यांनी पालिकेच्या या दुटप्पी धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अंबानी यांच्या ५ फुटांच्या मूर्तीचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर करण्यात आले, मग सर्वसामान्य गणेशभक्तांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात का करण्यात येत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button