
१७ कंपन्यांसोबत ३४ हजार कोटींचे सामंजस्य करार, रोजगार निर्मितीही होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांची उपस्थिती
मुंबई : उद्योगांना पोषक असं वातावरण निर्माण केल्यामुळं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योजक गुंतवणूक करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग तथा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत अशा १६ कंपन्यांनी राज्याच्या विविध भागांमध्ये ३४ हजार २६९ कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) केले आहेत. या गुंतवणूकीतून ३३ हजार ६८३ रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी दिली.
सह्याद्री अतिथिगृहात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे सीईओ पी. वेलरासू, विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह करार करणाऱ्या कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, “महाराष्ट्र सरकारनं उद्योगांना पोषक वातावरण निर्मिती केली आहे. उद्योजक, गुंतवणूकदार यांच्याशी सातत्यानं संवाद ठेवला, त्यांच्या अडीअडचणींना तातडीनं सोडविण्यावर भर दिला. अशा सामूहिक प्रयत्नांचं फलित म्हणजेच आजचे हे सामंजस्य करार आहेत.
देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. राष्ट्रीय सकल उत्पादनात सुमारे ५३० अब्ज डॉलर इतकं योगदान महाराष्ट्राचं आहे. याशिवाय देशाच्या औद्योगिक उत्पादनात १५.४% वाटा हा महाराष्ट्राचा आहे. देशातील ३०% थेट परकीय गुंतवणूक (FDI) आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्यानं आघाडीवर असून, उद्योग-व्यवसायांना पोषक वातावरण निर्मित करण्यासाठी इतर सर्व विभागांसोबत योग्य संवाद ठेवून उद्योग विभाग सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत” या उद्दिष्टाशी सुसंगत अशी वाटचाल महाराष्ट्र करतोय. त्यामुळेच २०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन आणि २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट महायुती सरकारनं ठेवलेलं आहे. महाराष्ट्र औद्योगिक धोरण २०१९ आणि आगामी औद्योगिक धोरण २०२५ यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत ५४० अब्ज डॉलर्सची नवी गुंतवणूक व ५ दशलक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) नं राज्यभर ३०० हून अधिक औद्योगिक क्षेत्रे विकसित केली असून, आयटी, वस्त्रोद्योग, रसायन, इलेक्ट्रॉनिक्ससाठी विशेष औद्योगिक पार्क उभी केली आहेत. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून, ३१,००० पेक्षा जास्त स्टार्टअप्स, २५+ युनिकॉर्न्स व MSME क्षेत्र राज्याच्या एकूण आर्थिक वृद्धीत मोठा वाटा उचलत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वर्धा बंदर, अटल सेतू, समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळं राज्याचं लॉजिस्टिक्स व कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होत आहे, त्यातून राज्याचा सर्वांगीण विकास होत असल्याचे गौरवोद्गार डॉ. उदय सामंत यांनी यावेळी काढले.
डॉ. उदय सामंत यांनी सांगितले की, या करारांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व रोजगारनिर्मिती होणार असून, महाराष्ट्र राज्य हे देश-विदेशातील गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण राहील, यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरुच राहतील.
या १६ कंपन्यांपैकी सर्वाधिक गुंतवणूक ही जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील मे. सिरम ग्रुप ऑफ कंपनीज यांच्याकडून पुणे इथं सुमारे ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यातून सुमारे ३ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे देखील डॉ. उदय सामंत ह्यांनी सांगितले.