महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांकडून महामंडळांचा आढावाप्राप्त परिस्थितीत सर्वांचे चांगले काम ; समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – आनंदराव अडसूळ


रत्नागिरी, दि.29 ):- काही ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता असतानाही तुम्ही सर्वजण चांगले काम करीत आहात. यापुढेही मनापासून असेच काम करुन सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून द्या. त्यासाठी तुमचे कौतुक करतो. तुमचे अभिनंदन करतो. शासनाच्या योजना राबविताना त्यामधील जाचक अटी, तुम्हाला येणाऱ्या समस्या, तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निश्चितच मी प्रयत्न करेन, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी दिले.
कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मधील सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात आज ही आढावा बैठक झाली. बैठकीला सहायक आयुक्त दीपक घाटे, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विठ्ठल आरेनवरु, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांच्यासह दिव्यांग महामंडळ, वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती महामंडळ, शामराव पेजे महामंडळ, संत रोहिदास चर्मकार महामंडळाचे व्यवस्थापक उपस्थित होते.
सहायक आयुक्त श्री. घाटे यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4.15 टक्के आहे. जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना मध्ये एकूण 34 कोटीची तरतूद आहे. दरवर्षी हा निधी 100 टक्के खर्च होत असतो. मागासवर्गीय शासकीय मुलांसाठी सहा आणि मुलींसाठी चार अशी एकूण दहा वसतीगृहे आहेत. मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था एकूण 5 आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 एकूण 18 गुन्ह्यांपैकी 14 न्याय प्रविष्ठ आहेत. 2 गुन्हे पोलीस तपासावर असून, 2 गुन्हे तपासाअभावी बंद आहेत.
आयोगाचे अध्यक्ष श्री. अडसूळ यांनी सर्व महामंडळाचा तसेच जिल्हा जात पडताळणी समितीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, ज्या योजनांमध्ये जाचक अटी आहेत, त्याबाबतच्या अटी शिथील करण्यासाठी शासनस्तरावर निश्चित प्रयत्न केला जाईल. सर्वसामान्य, मागासवर्गीय, आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांची जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर व्हायला हवीत. त्यासाठी बँकांकडे पाठपुरावा करा. तुम्ही सर्वजण चांगली कामगिरी करीत आहात. त्याबद्दल तुमचे कौतुक करतो. अभिनंदनही करतो. सर्वसामान्य माणसाशी, समाजाशी नाळ जुळलेली आहे. त्यांच्या हालअपेष्टा आपण पाहिलेल्या आहेत. आपण सर्वजण तेथूनच आलो आहोत. अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी जेवढे करता येईल तेवढे करा. तुमच्या अपेक्षा तुम्हाला येणाऱ्या समस्या निश्चित सोडविण्यासाठी प्रयत्न करु. सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्री. अडसूळ यांनी अभिवादन केले.
शेवटी श्री. आरेनवरु यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button