
जरांगेंच्या आंदोलनाआडून सरकार उलथवण्याचा डाव, विरोधकांसह अजित पवारांचे आमदारही सामील; लक्ष्मण हाकेंचा मोठा आरोप!
: मनोज जरांगें यांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी यावर टीका केली आहे. हा लढा हा आरक्षणाचा नाही तर तो राजकीय अजेंडा आहे. या आंदोलनाआडून सरकार उलथवून टाकण्याचा विरोधकांचा डाव आहे. यात अजित पवारांचे आमदार-खासदारही सामील आहेत असा गंभीर आरोप हाके यांनी केला आहे.
जरांगे नावाची एक काडी होती, तिला ज्वालामुखी करण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मंत्री मंडळातील काही मंत्री जबाबदार आहेत असा आरोप हाके यांनी केला. ओबीसींचे आरक्षण संपवून टाकायचा एककलमी कार्यक्रम विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी हाती घेतला आहे. विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी, यांच्यासह रविंद्र चव्हाण यांनी जरांगेंच्या आंदोलनाला जाहीर रसद पुरविली. मनोज जरांगे यांनी मुख्यंमत्र्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले तरी अजित पवारांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अशी टीकाही त्यांनी केली.
जरांगे याना रेड कार्पेट घातले जात आहे. मी गेवराईला गेलो तर माझ्यावर एफआयआर झाली. जरांगे याना सर्वपक्षीय आमदार रसद पुरवत आहेत. पाच ते १० टक्के झुंडीने लोक मुंबईला गेले असतील तर आम्ही ५० टक्के आहोत. ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन जावे अन्यथा तुम्हाला ओबीसी माफ करणार नाहीत. सरकारने आत्तापर्यंत ६० टक्के बोगस सर्टिफिकेट दिले असतील तर मुख्यमंत्र्यांनी समजावं की ओबीसी आरक्षण संपले आहे, असे हाके म्हणाले.




