राज्य शासनाकडून पोलिस दलास २५९ मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन दिल्या जाणार…

सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य आहे. यासाठी राज्य शासनाकडून पोलिस दलास २५९ मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन दिल्या जाणार आहेत.व्हॅनमध्ये रासायनिक विश्लेषण करणारी उपकरणे, डीएनए-रक्त नमुन्यांसाठी विशेष किट्स आणि डिजिटल पुरावे जमा करण्याची साधने उपलब्ध असतील. त्यामुळे खून, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांत तक्रारदार, साक्षीदार फितूर झाल्यामुळे किंवा सबळ पुराव्यांअभावी आरोपी सुटणार नाहीत.

काय आहे फॉरेन्सिक व्हॅन

अनेक गंभीर गुन्ह्यात सबळ पुरावे उपलब्ध नसल्याने किंवा फिर्यादी, साक्षीदार फितूर झाल्यामुळे आरोपी निर्दोष सुटतात. गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी सक्षम पुरावे गरजेचे असतात. यासाठी राज्य सरकारने मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन पोलिसांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्हॅन गुन्हा घडलेल्या ठिकाणी जाऊन पुरावे जमवणार तसेच त्याचे रासायनिक विश्लेषण करून आरोपींच्या विरोधातील सबळ पुरावे पोलिसांना देणार आहे.

सध्या एक व्हॅन उपलब्ध

राज्य सरकारने घोषणा करण्यापूर्वीच कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाकडे एक फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत होती. तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी फॉरेन्सिक व्हॅन तयार करवून घेतली होती. आता नवीन योजनेंतर्गत एक व्हॅन जिल्हा पोलिस दलास मिळण्याची शक्यता आहे.

व्हॅनमध्ये असलेल्या सुविधा

मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये पुरावे जमा करण्यासाठी डिजिटल साधने आणि उपकरणे असतील. रक्ताचे नमुने घेणे, त्यांचे रासायनिक विश्लेषण करणे, यासाठी लागणाऱ्या आवश्यक कीट व्हॅनमध्ये असतील. हे सर्व काम पाहण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथकही व्हॅनसोबत असेल. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे तपास गतिमान होणार आहे. तसेच गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यास मदत होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button