
सागरी संरक्षण क्षमता अधिक बळकट; उदयगिरी, हिमगिरी युद्धनौकांचे राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत लोकार्पण
वृत्तसंस्था, विशाखापट्टणम : भारतीय नौदलाने मंगळवारी ‘आयएनएस उदयगिरी’ आणि ‘आयएनएस हिमगिरी’ या दोन युद्धनौकांचे लोकार्पण केले. यामुळे भारताच्या सागरी संरक्षण क्षमतेमध्ये मोठी भर पडणार आहे. दोन्ही युद्धनौका प्रत्येकी आठ ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी युक्त आहेत. यामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाने बनविलेली शस्त्रास्त्रे आणि सेन्सर यांचा संच कार्यान्वित आहे.
हा कार्यक्रम संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली येथील भारतीय नौदलाच्या मुख्यालयात झाला. दोन वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये बांधलेल्या युद्धनौकांचे एकाच वेळी जलावतरण होण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
या कार्यक्रमामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्याचे सामरिक महत्त्वही अधोरेखित झाले. ‘युद्धनौकांमधील शस्त्रास्त्रे आणि सेन्सर यांमुळे या युद्धनौका समुद्राच्या रक्षक बनल्या आहेत. या युद्धनौका प्रगत तंत्रज्ञानाने युक्त आहेत, असेही मला सांगण्यात आले आहे. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे, सुपरसोनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्रे, टोर्पेडो लाँचर्स, कॉम्बॅट व्यवस्थापन प्रणाली, अग्निशमन यंत्रणा यांसारखी प्रगत प्रणाली या युद्धनौकांमध्ये आहे,’ असे प्रतिपादन सिंह यांनी या वेळी बोलताना केले.
या आधुनिक युद्धनौका समुद्रातील अतिशय गुंतागुंतीच्या आणि धोकादायक मोहिमांमध्ये गेमचेंजरची ठरतील, असेही सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, लोकार्पण झालेल्या या युद्धनौकांमुळे दोन अत्याधुनिक लढाऊ जहाजे नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. यामुळे देशाची सागरी ताकद आता अधिक वाढली आहे, अशी पोस्ट भारतीय नौदलाकडून ‘एक्स’वर करण्यात आली आहे.
100वे जहाज ठरले
योगायोगाने उदयगिरी हे नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्यूरोने (डब्ल्यूडीबी) तयार केलेले १०० वी नौका ठरली आहे. त्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनविण्यात येणाऱ्या पाच दशकांच्या युद्धनौकांमधील ते मैलाचा दगड ठरले आहे.