
साखरपा-पाली मार्गावर गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई
२८ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
रत्नागिरी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २८ लाख ४० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
काल (२७ ऑगस्ट २०२५) रोजी देवरूख-साखरपा-पाली मार्गावर गस्त घालत असताना पथकाने याहू ढाब्यासमोर एक संशयास्पद पिकअप वाहन (MH-10-CR-8366) अडवले. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व गुटखा आढळून आला. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत गोण्या व पुठ्याच्या बॉक्समध्ये भरलेला हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी विकास गंगाराम पडळकर (२८, रा. इस्लामपूर, जि. सांगली) आणि तेजस विश्वास कांबळे (२३, रा. मिरज, जि. सांगली) या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी हा मुद्देमाल संगमेश्वर येथे वितरणासाठी नेत असल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिसांनी २१ लाख ४० हजार १६० रुपयांचा गुटखा व ७ लाखांचे अशोक लेलँड पिकअप वाहन असा एकूण २८ लाख ४० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.
ही कारवाई पो.उ.नि. श्री. ओगले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी झोरे, डोमणे, पालकर, कदम, खांब, सवाईराम, दरेकर, सावंत व कांबळे यांनी संयुक्तरीत्या केली.