
विद्यापीठांशी संबंधित सेवा आता ‘आपले सरकार’वर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय!
पुणे : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशासह विविध शैक्षणिक कामकाजांसाठी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी माराव्या लागणाऱ्या हेलपाट्यांपासून आता सुटका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विद्यापीठाशी संबंधित सेवा आता ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठाशी संबंधित अधिसूचित सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर ऑनलाइन सुरू करण्याबाबत मंत्रालयात नुकतीच बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्यासह राज्यभरातील विविध विद्यापीठातील कुलगुरू, अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
विद्यापीठांच्या सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळाशी जोडण्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे प्रवेश घेण्यासह नोकरी, शिष्यवृत्तीच्या कामासाठी आवश्यक असलेले विविध दाखले, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र अशी कागदपत्रे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करून घरबसल्या मिळणे शक्य होणार आहे.विद्यापीठाशी संबंधित ५६ अधिसूचित सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २० सेवा थेट विद्यापीठाशी संबंधित आहेत. या माध्यमातून राज्यातील जवळपास २० लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. ‘विद्यार्थ्यांना या सेवा मुदतीत मिळाव्यात यासाठी विद्यापीठांनी डॅशबोर्डवर आलेल्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी करून कार्यवाही करावी,’ असे निर्देश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.