
वर्तक कुटुंबीयांनी साकारला शासकीय शालेय इमारतींची दुरुस्ती करण्याचे आवाहन करणारा देखावा…
इकोफ्रेंडली राजाचे सलग १७ वे वर्ष
रत्नागिरी : शहराजवळील उत्कर्ष नगर, वैभव सोसायटी, कुवारबाव येथील रहिवासी असलेले संजय जगन्नाथ वर्तक यांच्या घरी सलग १७ व्या वर्षी पर्यावरणपूरक (इकोफ्रेंडली) गणपती बाप्पा साकारण्यात आले आहेत. यावर्षी वर्तक कुटुंबीयांनी शासकीय शालेय इमारतींची असलेली दुरवस्था देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला असून या शाळा दुरुस्तीसाठी आवाहन या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
संजय जगन्नाथ वर्तक हे गेल्या १७ वर्षांपासून नारळाची सोडणं (काथ्या), सुंभ, कागद, पुठ्ठे आदी पर्यावरणपूरक वस्तूंचा अतिशय कल्पकतेने वापर करत गणपती साकारत आहेत. त्याचबरोबर देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचाही वर्तक कुटुंबीयांचा नेहमीच प्रयत्न असतो. याहीवर्षी वर्तक कुटुंबीयांनी शासकीय शालेय इमारतींची जीर्ण झालेली अवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीची नितांत गरज या विषयावर यावर्षीच्या देखावा साकारला आहे. गणेशोत्सवात गणपती बापाच्या चरणी कोटींचे दान करणाऱ्या गणेशभक्तांना शाळेच्या दुरुस्तीसाठी दान करण्याचे आवाहन करण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य असे संबोधण्याचे कारण म्हणजे त्याला लाभलेला सामाजिक सुधारणेचा, जातीव्यवस्थे विरोधी चळवळीचा आणि आधुनिक विचारांचा वारसा. फक्त सामाजिक नव्हे तर आर्थिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातही महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे. या सामाजिक, आर्थिक आणि वैज्ञानिक कामगिरीचा पाय म्हणजे शिक्षण. पण आज हेच शिक्षण प्रदान करणाऱ्या शाळांची परिस्थिती अनेक भागांमध्ये आव्हानात्मक आहे. अनेक शाळांच्या इमारती जुन्या व जीर्ण अवस्थेत आहेत. इमारतीचे छत कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. जर या शाळाच कार्यक्षम राहिल्या नाहीत तर महाराष्ट्राला पुरोगामी बनवणारे विचारवंत कसे निर्माण होतील.
याच जागृतीसाठी या वर्षी शालेय इमारतींचे दुरुस्तीचे आवाहन करणारा बाप्पाचा देखावा शाळेच्या वस्तूतून साकारला आहे. देखाव्यात एक विद्यार्थी आपल्या शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रार्थना करत आहे व त्याचा प्रार्थनेला प्रसन्न होऊन बाप्पा प्रकट होताना दिसत आहे. बाप्पाचे शीर पुट्ठे , कागद व पाटीवरच्या खडूचा कल्पक्तेने वापर करून बनवले आहे. देखाव्यात नारळाच्या किशीचे, टाकाऊ पुठ्ठ्याचा, शाडू मातीचा व कागदांचा वापर केलेला आहे. पुस्तकाची प्रतिकृती असलेले पूजेच्या गणेश मूर्तीचे आसन जुन्या कागदांपासून बनवलेले आहे.
या देखाव्यातून शाळेच्या इमारतीची जीर्ण अवस्था दाखवून, गणेशोत्सवात गणपतीच्या चरणी कोटींचे दान करणाऱ्या गणेशभक्तांना शाळेच्या दुरुस्तीसाठी दान करण्याचे आवाहन करण्याचा प्रयत्न केला आहे.
गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावा पाहण्यासाठी संपर्क :
नाव - संजय जगन्नाथ वर्तक.
फोन नंबर - 9421231963 / 7387808883 / 8446274460
पत्ता - १५८, दुर्वांकर, उत्कर्ष नगर, वैभव सोसायटी, कुवारबांव, रत्नागिरी.