
राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे गणपतीच्या दर्शनाला, उत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र!
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंची चर्चा आहे. ५ जुलैला विजयी मेळाव्यात दोन भाऊ एकत्र आले होते. त्यानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले होते. आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले आहेत. गणपतीच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत. राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी उद्धव ठाकरे उपस्थित झाले आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे असे सगळेजण राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उपस्थित झाले आहेत.
ठाकरे बंधू यांचं स्नेहभोजनही असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरेंच्याघरी दीड दिवसाचा गणपती असतो. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुन गणपतीसाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारुन उद्धव ठाकरे हे आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही आहेत. उद्धव ठाकरे हे आज दुपारी राज ठाकरे स्नेहभोजन होणार आहे.
आधी राज ठाकरे मातोश्रीवर, आता उद्धव ठाकरे शिवतीर्थावर
२७ जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन झालं आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
राज ठाकरे हे गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर आज उद्धव ठाकरे हेदेखील राज यांच्या घरी गेले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. शिवतीर्थवरील आजच्या भेटीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.