
मनोज जरांगेंची तोफ आझाद मैदानातच धडाडणार! परवानगी मिळाली, पण मुंबई पोलिसांनी दिला दम, नियम मोडले तर..
मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नियमांच्या आधारावर आणि अटींचं पालन करण्याबाबत ही परवानगी देण्यात आली आहेपोलिसांनी त्यांच्या आदेशात म्हटलंय, हे आंदोलन फक्त एका दिवसासाठी असेल. यामध्ये जास्तीत जास्त 5000 आंदोलन सहभागी होऊ शकतात. कारण मैदानात एवढ्याच माणसांची क्षमता आहे.
पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार, हे आंदोलन फक्त एका दिवसासाठीच असेल. शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी परवानगी देण्यात येणार नाही. आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांच्या वाहनांनी मुंबई प्रवेश केल्यानंतर त्यांना वडी बंदर जंक्शन येथून जावं लागेल. तेथून फक्त 5 वाहनेच आझाद मैदानापर्यंत जातील. बाकी सर्व वाहनांना पोलिसांनी निर्धारित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी जावं लागेल.
आंदोलकांची संख्या आणि वेळ..
पोलिसांनी आदेशात म्हटलंय की, जास्तीत जास्त 5000 आंदोलक या मोर्चात सहभागी होऊ शकतात. आझाद मैदानाचा 7000 वर्ग मीटर इतका भागच आंदोलनासाठी आरक्षीत आहे. याची क्षमता 5000 आंदोलकांएवढी आहे. आंदोलनाची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निर्धारित केली आहे. त्यानंतर आंदोलकांना मैदानात राहण्याची मुभा नसेल. तसच परवानगीशिवाय लाऊड स्पीकरचा उपयोग करता येणार नाहीय.आंदोलनकर्ते मैदानात जेवण शिजवणार नाहीत आणि कचराही टाकणार नाहीत. गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही, याची आंदोलकांनी काळजी घ्यावी. लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध लोक या आंदोलनात सहभागी होणार नाहीत, असंही आदेशात म्हटलंय. पोलिसांनी म्हटलंय की, नियमांचं उल्लंघन केलं, तर आंदोलन बेकायदेशीर असल्याचं घोषित केलं जाईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.