
एसआयडी’ने घेतली मुंबईला येणाऱ्या आंदोलकांची आकडेवारी! मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील आज मुंबईच्या दिशेने निघणार
मराठा व कुणबी दोघेही एकच असल्याच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. सरकारने मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील हे आज (बुधवारी) मुंबईच्या दिशेने निघणार आहेत.त्यांच्यासमवेत प्रत्येक जिल्ह्यातून किती मराठा बांधव मुंबईत येतील, याची अंदाजे आकडेवारी राज्याच्या गुप्तचर विभागाने (एसआयडी) प्रत्येक शहर- जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांकडून घेतली आहे.
मराठा आरक्षणाबरोबरच अन्य काही मागण्यांसाठी जरांगे- पाटील मुंबईत २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण करणार आहेत. त्यासाठी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांना साथ देण्याची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक शहर- जिल्ह्यातील अनेक मराठा नेत्यांनी आपल्या भागातून किती गाड्या व किती लोक मुंबईला निघतील, हे जाहीर केले आहे. याशिवाय राज्याच्या गृह विभागाने पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक कार्यालयातूनही मुंबईत २९ ऑगस्ट रोजी किती मराठा बांधव येतील, याचा अंदाज घेतला आहे. आंदोलकांच्या संख्येचा अंदाज घेऊन मुंबईतील वाहतूक व्यवस्था, बंदोबस्तासाठी लागणारे पोलिस याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता गृह विभागाकडून घेतली जात आहे.