
रत्नागिरीत डी मार्ट मध्ये खरेदी करण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या मोटरसायकलला डंपरची धडक एकाचा मृत्यू एक जखमी
रत्नागिरी शहरात आज संध्याकाळी भीषण अपघात घडला आहे चर्मालयजवळ झालेल्या भीषण अपघातात डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मयूर घडशी (वय २१, रा. शिरगाव तिवेंडेवाडी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र ओंकार सनगरे (वय २२) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना संध्याकाळी ७ च्या सुमारास घडली. मयत मयूर आणि जखमी ओंकार हे दोघे मित्र दुचाकीवरून डीमार्ट येथे काही खरेदी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात मयूर याचा जागीच मृत्यू झाला
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी ओंकारला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, डंपर चालकाचा शोध सुरू आहे.
मयूरच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे