
गुन्हे अन्वेषण शाखेने एका मोठ्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईत २ लाख ४० हजार १०० रुपये किमतीचा ४ किलो गांजा जप्त केला…
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका मोठ्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईत २ लाख ४० हजार १०० रुपये किमतीचा ४ किलो गांजा जप्त केला असून, या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रत्नागिरी शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांवर प्रतिबंध आणि कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात गस्त सुरू केली होती.
गस्तीदरम्यान, शहरातील आठवडा बाजार परिसरात एका अर्धवट बांधकाम केलेल्या शेडजवळ एक संशयास्पद व्यक्ती आढळली. त्याच्या पाठीवर एक सॅक होती आणि तो संशयास्पद हालचाली करत होता. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी लगेच दोन पंचांना बोलावून त्या व्यक्तीच्या सॅकची झडती घेतली.
झडतीमध्ये, सॅकमध्ये दोन पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक टेपने गुंडाळलेली पॅकेट मिळाली. तपासणी केली असता, त्यात हिरवट, काळपट आणि उग्र वासाचा ४ किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या गांज्याची अंदाजे किंमत २४०,००० रुपये असून, इतर मुद्देमालासह एकूण २,४०,१०० रुपये किमतीचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नंदादीप नामदेव वाघदरे (वय २९, रा. लांजा) असे आहे. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६३/२०२५, एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ च्या कलम ८ (क) आणि २० (ब)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. या पथकात पो.उनि. संदीप ओगले, पो.हवा. शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकट, अमित कदम, प्रविण खांबे, गणेश सावंत, सत्यजित दरेकर तसेच चा.पो.कॉ. अतुल कांबळे आणि दत्ता कांबळे यांचा समावेश होता. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.




