आंबेनळी घाट आणि वरंध घाटातील वाहतुकीबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण आदेश!

रायगड : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्गावरील वाहतूक अखेर पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून अतिवृष्टीचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी दिली जाणार आहे.

पूर्वीच्या आदेशानुसार सुरक्षिततेच्या दृष्टीने आंबेनळी घाट मार्गावर अवजड वाहतुकीस पूर्ण बंदी घालण्यात आली होती. तसेच पावसाळ्यात ऑरेंज आणि रेड अलर्ट असताना हलक्या वाहनांनाही बंदी घालण्यात आली होती. याशिवाय रात्रीच्या वेळी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली होती.

दरम्यान, कार्यकारी अभियंता (कोकण), महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने घाटरस्त्यावरील सुधारणा आणि मजबुतीकरणाची कामे पूर्ण केली आहेत. ढिगारे हटविणे, अडथळे दूर करणे आणि रस्ता प्रवासासाठी सुरक्षित बनविण्याची कामे पूर्ण झाल्यामुळे रस्ता पुन्हा सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी महाड यांच्या अहवालाचा अभ्यास करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला, त्यानुसार आंबेनळी घाट मार्ग आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला असून अतिवृष्टीच्या दिवसांत मात्र हा मार्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवला जाईल.

वरंध घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला

दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडीवरील राजेवाडी ते वरंध (रायगड जिल्हा हद्द) हा रस्ता आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून अतिवृष्टीच्या दिवसांत मात्र हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे आणि भारतीय हवामान विभागाच्या हाय अलर्ट इशाऱ्यामुळे हा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला होता. या बंदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आगामी गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्याची मागणी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून केली जात होती.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी महाड विभाग यांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे. रस्ता आता पुन्हा सुरु करण्यात येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

“अतिवृष्टीचा इशारा असलेल्या दिवसांत वरंध घाट रस्ता पूर्णतः बंद ठेवला जाईल. अशा वेळी स्थानिक पोलिस प्रशासनाने पुरेसा बंदोबस्त ठेवावा,” असे निर्देशही देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button