
मतदार यादीशी संबंधित चुकीचा डेटा शेअर केल्याप्रकरणी संजय कुमारांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने कारवाईला दिली स्थगिती!
: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेच्या आरोपांवरून निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करत आहेत. या मुद्यांवरून राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेत काही पुरावेही सादर केले होते. राहुल गांधींच्या आरोपानंतर देशभरात चांगलंच राजकारण तापलेलं असतानाच ‘सीएसडीएस’चे (सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी) प्रमुख तथा राजकीय विश्लेषक संजय कुमार याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल झाला होता.
एका मतदार संघातील मतदार संख्येबाबत चुकीची माहिती समाजमाध्यमात प्रसारित केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, त्यानंतर त्यांनी या संदर्भातील पोस्ट डिलीट देखील केली होती. दरम्यान, मतदार यादीतील त्रुटींबद्दल पोस्ट केल्याच्या प्रकरणात संजय कुमार यांच्याविरुद्धच्या खटल्यांना आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
संजय कुमार यांच्या विरुद्धच्या एफआयआरला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती देण्यात निर्णय दिला आहे. भारताचे मुख्य सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. तसेच संजय कुमार यांच्या विरुद्धचा गुन्हा रद्द करण्याच्या त्यांच्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे.
संजय कुमार यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी म्हटलं की, “या व्यक्तीमध्ये निर्दोष प्रामाणिकपणा आहे. देश आणि जमाजासाठी तीस वर्षे प्रामाणिक सेवा केली आहे. त्यांचा खूप आदर आहे. पण ही एक चूक होती. मात्र त्यांनी याबाबत माफी देखील मागितलेली आहे.”
नेमकं प्रकरण काय?
संजय कुमार यांनी त्यांच्या एक्स हँडलवर १७ ऑगस्ट रोजी एक पोस्ट केली होती की महाराष्ट्रातील रामटेक आणि देवळाली मतदार संघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांच्या संख्येत ३६-३८ टक्के घट झाली. मात्र, दोन दिवसांनंतर त्यांनी या पोस्ट संदर्भात माफीही मागितली होती.
संजय कुमार यांनी म्हटलं होतं की, “महाराष्ट्र निवडणुकीबाबत पोस्ट केलेल्या ट्विटबद्दल मी मनापासून माफी मागतो. २०२४ च्या लोकसभा आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या डेटाची तुलना करताना काही त्रुटी झाल्या. आमच्या डेटा टीमने सलग डेटा चुकीचा वाचला. पण त्यानंतर ते ट्विट काढून टाकण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.”