
टिळक आळीचा जल्लोषात होणार शताब्दी गणेशोत्सव
टिळक आळीतील श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थानचा यंदा शंभरावा गणेशोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यंदा हा उत्सव अकरा दिवस होणार असून अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात येणार आहे.श्रींची पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत मिरवणूक २६ ऑगस्टला सायंकाळी ६ निघणार आहे. २७ ला पहाटे ६ वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना, रात्री ८.३० वाजता आरती मंत्रपुष्प, ९ वाजता महेशबुवा सरदेसाई यांचे कीर्तन, रात्री १०.३० वाजता राधा भट प्रस्तुत स्वर झंकार हा सुरेल गीतांचा कार्यक्रम सादर होईल. उत्सव काळात दररोज रात्री ९ वाजता आरती, मंत्रपुष्प होईल. २८ ऑगस्टला रात्री १० वाजता छू मंतर नाट्यप्रयोग मंडळातील कलाकार सादर करतील. २९ ऑगस्टला श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगीत दिलेल्या गाण्यांचा तो राजहंस एक हा कार्यक्रम सादर होईल. ३० ऑगस्टला शनिवार असल्याने पारप्रासादिक चक्री भजन रंगणार आहे. रविवारी (ता. ३१) सायंकाळी ५ वाजता मंत्रजागर, रात्री १० वाजता श्रीरंग निर्मिती यु आर ग्रेट पप्पा हे दोन अंकी विनोदी नाटक सादर होणार आहे.उत्सवात १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता टिळक आळी मर्यादित कराओंके कार्यक्रम सादर होईल. रात्री १० वाजता आळीतील बालदोस्त कलाकार विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करतील. २ सप्टेंबरला कलारंग प्रस्तुत धन्य धन्य ते टिळक हा अनोखा कार्यक्रम, ३ सप्टेंबरला रात्री १० वाजता शमिका- राधिका लाइव्ह हा कार्यक्रम रंगणार आहे. याच दिवशी सायंकाळी ४ वाजता महिला भगिनींचे अथर्वशीर्ष पठण होईल.