
सकल हिंदूंनी आज भगवान वराह जयंती साजरी करावी
रामानंदाचार्य नरेंद्राचार्य
नाणीज, दि २४: सकल हिंदुनी भगवान वराह यांची जयंती उद्या (२५ ऑगस्ट) साजरी करावी, असे आवाहन दक्षिण पिठाचे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, “हिंदू धर्म ज्या ज्या वेळी अडचणीत येतो, त्या त्या वेळी स्वतः परब्रम्ह विविध रूपाने अवतार घेऊन स्वतः हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अवतारित होतात. अन्य धर्मापेक्षा हे हिंदू धर्माचे उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. भगवान कृष्णांनी गीतेमध्ये त्याचा पुनर्विचार केलेला आहे.
यदा यदा ही धर्मस्य….
ज्या ज्या वेळी धर्माची दुष्कर्म करणाऱ्या शक्तींपासून हानी होते त्या त्यावेळी प्रत्यक्ष परब्रम्ह या पृथ्वीतलावर अवतार घेत असते. भगवान विष्णू नी मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, भार्गव राम, श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी अवतार घेतले आहेत. समाज विघातक दानव प्रवृत्तीच्या शक्तीचा विनाश करण्यासाठी वेळोवेळी असे अवतार धारण केलेले आहेत. भाद्रपद मास, शुक्लपक्ष ,तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू हे वराह रूप धारण करून या पृथ्वीतलावर हिरण्याक्ष दानवाचा वध करण्यासाठी अवतरले. हिरण्याक्ष दानवाने पृथ्वी रसातळाला नेऊन बुडविली. पृथ्वीतलावर आलेले हे महाभयंकर संकट ओळखून देवाने वराह रूप धारण केले आणि पृथ्वीला आपल्या सुळ्यावर धारण करून हिरण्याक्ष राक्षसाचा वध करून दानवांच्या जाचातून तिची मुक्तता केली. “आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रम्ह….” या आरतीमध्ये या गोष्टीचा उल्लेख आढळतो तो असा आहे कि “दाढे धरुनी पृथ्वी नेता, वराह रूप होसी.” या अवतारात भगवंताने आपली शक्ती आणि क्षमता यांचे दर्शन घडवून दिलेले आहे. यामुळे सकल हिंदू समाजाने हे शौर्याचे प्रतिक म्हणून आणि आपल्या भगवंताच्या अवताराचे स्मरण म्हणून पूजन करायला पाहिजे.”
“दिनांक 25 ऑगस्ट 2025 या दिवशी तमाम हिंदू बांधवांनी भगवान वराहाची मूर्ती किंवा प्रतिमा घरामध्ये स्थापित करून विधिवत आणि क्षमतेनुसार पूजन करायला हवे. पूजनानंतर “हे भगवंता आम्हाला शक्ती दे, धैर्य दे आमच्या मध्ये हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी संघटित होण्याची क्षमता दे, असा उपहार मागू या!” असे आवाहन रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिजधामचे रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी केले आहे.