
राजापुरातील त्या पुरातन वास्तुबाबत विधिमंडळातील आपल्या त्या विधानाचा विपर्यास करून बदनामीचा प्रयत्न : ना. उदय सामंत
राजापुरातील त्या पुरातन वास्तुबाबत विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना नगर विकास विभागाकडून राज्याचा मंत्री म्हणून आपण राजापुरातील चिंचबांध येथील ती पुरातन वास्तु हे सुर्यमंदिर नाही असे सभागृहात उत्तर दिलेले आहे..याबाबत दिल्ली पुरातत्व विभाग व राजापूर नगर परिषद प्रशासनाकडून आपल्याकडे आलेल्या अहवालाच्या आधावर आपण ती माहिती सभागृहात दिली आहे व ती रेकॉर्डवरही उपलब्ध आहे. मात्र या विधानाबाबत विपर्यास करून व फेक नरेटीव्ह पसरवून नाहक आपल्याला टार्गेट करण्याचा बदनामी करण्याचा प्रयत्न काहींनी केला. मी देखील एक हिंदू आहे व मलाही माझ्या धर्माचा अभिमान आहे, मात्र अशा प्रकारे आपल्या विधानाचा विपर्यास करून समाजात नाहक गैरसमज पसरविण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी राजापुरात पत्रकार परिषद दिली.
अशा प्रकारे आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून विपर्यास करण्यापुर्वी व आपल्या निषेधाचा ठराव करण्यापुर्वी संबधितांनी आपल्याशी चर्चा केली असती तर आपण नक्कीच योग्य माहिती देऊन त्यांचे समाधान केले असते असेही ना. सामंत यांनी यावेळी नमुद केले. ही पुरातन वास्तु सुर्यमंदिर आहे का? याबाबत प्रत्यक्ष पहाणी करून संशोधन करण्यासाठी राजापूर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित गठीत करण्यात येत असल्याची घोषणा करून या समितीने १० ऑक्टोबर पर्यंत आपल्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. या समितीच्या अहवालात जर ते सुर्यमंदिर असल्याचे सिध्द झाले तर नक्कीच ते हिंदूचे असेल यात कोणालाही शंका असण्याचे कारण नाही असेही ना. सामंत यांनी सांगितले.
राजापूर शहरातील चिंचबांध येथील पुरातन वास्तुबाबत वाद निर्माण झाला आहे. सदरची वास्तु ही पुरातन सुर्यमंदिर असल्याचा दावा सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी राजापुरात धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. या धर्मसभेत सदरचे मंदिर सुर्यमंदिरच असल्याचे नमुद करत ते ताब्यात घेण्याचा निर्धार करण्यात आला. तर पालकमंत्र्यानी विधिमंडळात केलेल्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या निषेधाचा ठरावही या सभेत करण्यात आला.
यावर शनिवारी राजापुरात येत ना. सामंत यांनी प्रशासकिय अधिकारी यांची बैठक घेतली व त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेते विस्तृत भूमिका मांडली. विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षधेधीला उत्तर देताना नगर विकास विभागाकडून राज्याचा मंत्री म्हणून आपण राजापुरातील चिंचबांध येथील ती पुरातन वास्तु हे सुर्यमंदिर नाही असे उत्तरात नमुद केलेले आहे. याबाबत दिल्ली पुरातत्व विभागाकडून व राजापूर नगर परिषद प्रशासनाकडून आपल्याकडे आलेल्या अहवालाच्या आधावर आपण ती माहिती सभागृहात दिली आहे व ती रेकॉर्डवरही उपलब्ध आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सुर्यमंदिर असल्याची नोंद आढळून येत नाही असा अहवाल या दोन्ही विभागांनी दिला आहे असे ना. सामंत यांनी सागितले. तर जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून मी हे उत्तर दिलेले नाही तर राज्य शासनाचा प्रतिनिधी व मंत्री म्हणून हे उत्तर दिलेले आहे. यावेळी मी पुरातन वास्तु असा उलेख केला असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. मात्र या विधानाबाबत व उत्तराबाबत योग्य माहिती न घेता त्याचा विपर्यास करू नाहक आपली बदनामी करण्याचा आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न काहींनी केला हे दुदैव असल्याचे त्यांनी नमुद केले.
राज्याचा मंत्री म्हणून व शासनाचा प्रतिनिधी म्हणून जे बोलतो, सांगतो ती राज्य शासनाची भूमिका असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या विषयाबाबत राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आपण माहिती दिलेली आहे असेही ना. सामंत यांनी नमुद केले. माझ्याशी चर्चा केली असती तर मोर्चा कोणाविरोधात करायचा निषेध कोणाचा करायचा हे मी निषेध करणाऱ्यांना जरूय सांगितले असते असा टोलाही ना. सामंत यांनी लगावला.