
रत्नागिरी शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरवस्था, राष्ट्रवादीची नगरपरिषदेवर धडक
रत्नागिरी शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरवस्था राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी पुराव्यासह रत्नागिरी नगर परिषदेवर मोर्चा नेत प्रशासनासमोर ठेवली. त्यावेळी खड्डे बुजविण्याचे आश्वासन मुख्याधिकार्यांनी दिल्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणखी आक्रमक झाले. या भूमिकेमुळे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी तातडीने नगर परिषदेचे प्रतिनिधी घटनास्थळी पाठवून दिले. पाहणी केल्यानंतर शहरातील सर्व. खड्डे आरएमसीने बुजवण्याचे आदेश त्यांनी दिले.
शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव या दोन प्रमुख समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी रत्नागिरी नगर परिषदेवर धडक देत मुख्याधिकारी वैभव गारवे यांना थेट जाब विचारला. यावेळी पदाधिकार्यांनी त्यांच्यासमोर या समस्यांची कैफियत मांडल्याने गारवे यांनी तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.
शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांची दूरवस्था पाहता केवळ खड्डे बुजवून चालणार नाही, पावसाळ्यात ते पुन्हा त्याच स्थितीत येतील. त्यामुळे आरएमसी वापरून टिकाऊ काम करावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. याचवेळी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, जागेवर गेल्याशिवाय समस्या समजत नाही, असे बोल मुख्याधिकारी यांना सुनावले. नियोजनबद्ध पद्धतीने समस्या मांडून आणि प्रशासनाला जागेवर जाऊन पाहणी करण्यास भाग पाडले. यावेळी माजी नगरसेवक सईद पावसकर, फरहान मुल्ला, बबन आंबेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com