मुसळधार पावसामुळे १०० हेक्टर शेतीचे नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने नद्यांना पूर आल्यामुळे किनारी भागातील ३६ गावातील सुमारे १०० हेक्टर शेती-बागायतीचे नुकसान झाले आहे. सुमारे २८८ शेतकऱ्यांचे ९ लाखांचे नुकसान कृषी विभागाने नोंदले आहे. सर्वाधिक फटका खेड तालुक्याला बसलेला आहे.
जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत सरासरी ३००४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आठवडाभरापूर्वी गतवर्षीच्या तुलनेत एक हजार मिमीची तफावत होती; मात्र आठ दिवसात पडलेल्या पावसामुळे ही तफावत कमी झाली आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ३२६९ मिमीची नोंद झाली होती. त्यात १६ ते १९ या कालावधीत जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यात वाहणाऱ्या प्रमुख नद्यांना पूर आला होता. त्यात जगबुडी, नारंगी, वाशिष्ठी, शास्त्री, गडनदी, बावनदी, काजळी, कोदवली, अर्जुना नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली होती. पुराचे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये पसरले होते. त्याचा फटका किनारी भागातील भातशेतीला बसला आहे. पावसामुळे सुमारे १००.६७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यातील ९८ हेक्टर भातक्षेत्राचा समावेश आहे. उर्वरित क्षेत्रात ०.४० हेक्टर फळबागायतीचा समावेश आहे. २८८ शेतकऱ्यांचे ९ लाख रुपयांचे नुकनास या पावसामुळे झाले आहे. मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसानंतर खरीप हंगामात प्रथमच सलग पाऊस पडला होता. त्याचे परिणाम शेतकऱ्यांना सहन करावे लागले आहेत. वाशिष्ठी, गडनदीचे पाणी अजूनही काही शेतीमध्ये तसेच असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button