
मुंबई रेल्वे पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत; रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाणे उभे राहणार!
मुंबई : कोकण रेल्वेवरील स्थानकांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. येत्या काही दिवसांत कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकात रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या रेल्वे पोलीस ठाण्यात सध्या तीन ते चार पोलीस अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचारी असतील.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेची, प्रवाशांच्या मालाची आणि रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) आहे. तसेच, रेल्वे स्थानके, रेल्वे परिसर, उपनगरीय मार्गावरील गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्यांची उकल करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते पनवेल, कसारा, खोपोली आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते डहाणू रोडपर्यंतची हद्द ही मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडे आहे. तर, रोह्यानंतर कोकणातील रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची, रेल्वे परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस ठाण्याची आहे, परंतु गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे.
मोबाइल चोरी, सोनसाखळी खेचणे, मारामारी, खून अशा घटना वाढल्याने या ठिकाणी रेल्वे पोलीस ठाण्याची उभारणी करणे अत्यावश्यक होते. यासह कोकण रेल्वे प्रवासात महिलांशी संबंधित गुन्हे घडत असल्याने, तत्काळ गुन्हा नोंद करून, तपास करणे गरजेचे असते. परंतु, कोकण रेल्वे हद्दीत गुन्हा घडल्यास, त्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात करावी लागत होती. त्यामुळे कोकण रेल्वेवरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडे दिली आहे. याबाबत शासनाकडून मान्यता मिळाली असून, आता रत्नागिरी रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्वरित तक्रार करणे सोयीस्कर होईल.
रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलाड ते राजापूर रेल्वे स्थानकाचा भाग असेल. तसेच, प्रत्येक स्थानकाच्या रेल्वे परिसराचाच भाग हद्दीत समाविष्ट केला आहे. त्यानंतर कोकण रेल्वेच्या स्थानकातील दोन्ही बाजूने ४०० ते ५०० मीटरचा भाग सोडल्यास उर्वरित भाग हा स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
येत्या काही दिवसांत रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे कार्यान्वित केले जाईल. या पोलीस ठाण्याची हद्द ही रायगडमधील कोलाड रेल्वे स्थानक ते विन्हेरे रेल्वे स्थानक आणि रत्नागिरीमधील दिवाणखवटी रेल्वे स्थानक ते राजापूर रेल्वे स्थानकापर्यंत आहे. या ठाण्यात सुमारे १५० रेल्वे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा कार्यरत राहणार आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी दिली.